शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील क्रीडा शिक्षक व शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किरण विठ्ठल झुरंगे यांना गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, पूना कॉलेज सायन्स आर्ट व कॉमर्स आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात झुरंगे यांना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, प्राचार्य आफताब शेख, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते यांच्या हस्ते गुणवंत जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. किरण झुरंगे हे समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात गेली वीस वर्षे क्रीडा विभाग व सामाजिक शास्त्र या विषयासाचे अध्यापन करत आहेत. यापूर्वीही त्यांना जिल्हा मुख्याध्यापक संघ, राज्य शिक्षक कृती समिती यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. विद्यालयामध्ये बेसबॉल, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, डॉजबॉल या खेळात अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडविले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजीराव भुजबळ, अध्यक्षा मंगलताई भुजबळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी झुरंगे यांचे अभिनंदन केले आहे.