शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत २०२२-२७ साठी झालेल्या निवडणुकीत मातब्बर विरूध्द राजकीय पार्श्वभूमी नसलेले तरुण अशीच राजकीय लढत पहावयास मिळाली असून मातब्बरांना तरुणांनी ६-१ असा जोराचा दे धक्का दिला आहे. टाकळी हाजी ग्रामपंचायत विभाजन झाले, माळवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत तयार होवून तब्बल अडीच वर्षे निवडणूक न झाल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. या दरम्यान अनेक चर्चांना उधाण आले होते. निवडणूक बिनविरोध होणार की नाही, ग्रामपंचायत चे पहिले सरपंच नक्की कोण होणार? यावरून अनेक तर्क वितर्क सर्वसामान्य नागरिकांकडून काढले जात होते. निवडणूक जाहीर झाली आणि सात जागांसाठी जवळपास पन्नास च्या आसपास फॉर्म भरले गेले.फॉर्म माघारीच्या आधी तडजोडीसाठी एक विशेष बैठक सुध्धा पार पडली.परंतु सत्ता आमचीच येणार या आविर्भावात दोन्हीही पॅनल चे कार्यकर्ते असल्याने जनसामान्यांमध्ये नको वाटणारी , नात्यागोत्यातील गुंता वाढविणारी पण तत्वांशी निष्ठा बनलेली निवडणूक सर्वसामान्यांवर लादली गेली.
एका बाजूला टाकळी हाजी चे माजी उपसरपंच, महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन, घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांचे कट्टर समर्थक सोपानराव भाकरे आणि त्यांच्या समवेत दिग्गज राजकीय,सामाजिक, उद्योग क्षेत्रात काम करणारे तसेच एका नामांकित बँकेचे निवृत्त अधिकारी तर दुसऱ्या बाजूला अनेक कालखंडापासून त्यांच्याच पक्षाचे मात्र त्यांच्याविषयी वैचारिक मतभेद असलेले माळवाडी सोसायटीचे चेअरमन, महाराष्ट्र सरकार कृषिरत्न पुरस्कार प्राप्त दौलतराव भाकरे आणि त्यांच्या सोबतीला काही राजकीय , सामाजिक नेते हे सोमनाथ भाकरे समर्थकांच्या साथीला.
सोपानराव भाकरे यांच्या माळवाडी ग्रामविकास पॅनल मधून स्वतःसह अनुभवी आणि ज्येष्ठांना संधी देण्यात आली तर दुसऱ्या गटाने मात्र माळवाडी ग्रामविकास परीवर्तन पॅनल कडून राजकीय पदांवर काम केलेल्या दिग्गजांना थांबवून ग्रामपंचायत विभाजनासाठी काम करणाऱ्या नवोदित तरुणांना संधी दिली.
सर्वच उमेदवार नात्याने एकमेकांच्या संबंधातील असल्याने मतदारांची मात्र गळचेपी झाली.त्यामुळे विजयाचे भाकीत करणे सर्वानाच कठीण होवून बसले होते. लक्ष्मी कृपेची जास्त जादू घडली असेल यात मात्र शंका आहे.
निकालानंतर ग्रामपंचायत विभाजनाचे शिल्पकार म्हणून ज्यांना पाहिले जात होते ते टाकळी हाजीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रसिक भाकरे यांच्यासह त्यांचे सहा साथीदार यांनी विजयश्री खेचून बाजी मारल्याने जेष्ठ नेते सोपानराव भाकरे यांच्यासह इतर साथीदार यांना मात्र तो जोराचा धक्काच आहे. अनेक राजकीय आखाडे गाजविणाऱ्या पैलवानांना प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या मल्लांनी चितपट केल्याने हा संपूर्ण तालुक्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन लढले असून यात कोणत्याही एका पक्षाला श्रेय देण्यापेक्षा हा विजय म्हणजे 'धन शक्ती विरूध्द जन शक्ती ' असाच म्हणावा लागेल.जनतेने दिलेला कौल मान्य करून सर्वांनी एकत्र राहिल्यास गावच्या विकासासाठी अडचणी येणार नाहीत.पाच वर्षे जनतेच्या विश्वासास पात्र राहू असे सोमनाथ भाकरे यांनी सांगितले.
विजयी उमेदवार ..
माळवाडी ग्रामविकास परिवर्तन पॅनल...
सोमनाथ रसिक भाकरे,आदिनाथ शिवाजी भाकरे, आनंदा विठ्ठल भाकरे,साधना राहुल गारुडकर,पूजा दौलत पांढरकर,नीलम अनिल रसाळ
माळवाडी ग्रामविकास पॅनल...
सुनिता सुरेश भाकरे