शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
मुखई येथील या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध सण, उत्सव व उपक्रमांचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने होत असते. त्याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गातील विद्यार्थीनिहाय संख्येनुसार प्रत्येक विद्यार्थिनीला एक राखी देण्यात आली. वर्गातल्या प्रत्येक मुलीने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलांना राखी बांधत आपल्या भावाला राखी बांधण्याच्या पवित्र सणाचा म्हणजेच रक्षाबंधनाचा आनंद घेतला. याप्रसंगी आश्रमशाळा हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील आपण सर्वजण सदस्य आहोत, त्यातील बहीण आणि भावाचे एक पवित्र नाते आहे, असे मत याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य शिरसाट यांनी व्यक्त केले. आश्रम शाळेत शिक्षण घेत असताना कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सण, उत्सव, परंपरा यांना पारखे होणार नाही याची काळजी सातत्याने घेतली जात असते. तसेच विद्यार्थ्यांच्या रक्षाबंधनाबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील प्रतिवर्षीप्रमाणे याप्रसंगी घेण्यात आला. यावेळेस विद्यालयातील शिक्षिकांनी प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राखी बांधत आपल्यातील एका वेगळ्या नात्याची जाणीव आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांना करून दिली. रक्षाबंधनाचे चोख नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.