शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील ग्रामपंचायत ची निवडणूक नुकतीच पार पडली असून सरपंच पदाची निवड मंगळवार दिनांक ३० रोजी होणार आहे. या तयारीसाठी माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी सदस्यांना बरोबर घेऊन गावामध्ये स्वछता मोहीम राबवली.
माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांच्या मार्गदर्शनाने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे गावातील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.
टाकळी हाजी येथे गावकारभार्यांनी गावाचा कारभार हातात घेण्यापूर्वी ग्रामस्वच्छता करून गावाचा कारभार स्वच्छ व पारदर्शक करण्याची सुरवात करत असल्याचे नवनियुक्त सदस्य नानासाहेब साबळे यांनी सांगितले.
पदभार स्वीकारण्या आधीच सर्व सदस्यांनी कामास सुरुवात केल्याने नागरिकांच्या या प्रतिनिधींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. यावेळी सर्व सदस्यांनी झाडू हातात घेवून गाव स्वच्छ केले आहे. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
टाकळी हाजी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असून जनतेने मोठा विश्वास दाखवत बहुमताने सत्ता दिली असल्याने गावातील लोकांच्या दृष्टीने विविध सोयी सुविधा ,त्यात आरोग्य ,शिक्षण, रस्ते,पाणी, लाईट,लोकांच्या असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.दामुशेठ घोडे माजी आदर्श सरपंच टाकळी हाजी.