शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक बापू पवार यांच्या उपस्थितीत धर्मादाय रुग्णालयांच्या बाबतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार पवार यांनी सांगितले की धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. रुग्णालयातील अशा रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास लावू नये. तसेच अशा रुग्णांसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्राची तत्परतेने योग्य ती दखल घेतलीच पाहिजे. रुग्णालयात २४ तास जनसंपर्क अधिकारी उपलब्ध असावेत यासह अनेक महत्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
काही रुग्णालये उत्तम कामगिरी करत आहेत, त्यांचे आमदार पवार यांनी अभिनंदन केले. मात्र अद्यापही अनेक रुग्णालयात या अनुषंगाने सुधारणा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, धर्मदाय सहआयुक्त बुके, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच धर्मदाय रुग्णालयांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.