शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी दिनांक २२ रोजी रात्री ललिता महादेव काळे हिचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे.
म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे घरकुल बांधलेले आहेत.या घरकुलामध्ये शेजारी शेजारी पाच कुटुंब राहत आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम ,तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता.
त्यांचे दोघांचे कायमच भांडत होत होते , काल गुरुवारी दिनांक २२ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली तेव्हा दोघांचे भांडण झाले होते , आणि त्यावेळी तो तिला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे असे ललिताची बहीण चांदणी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पहाटे चार वाजता त्याच्या मोटारसायकलचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे पाहिले तेव्हा तो मोटार सायकल चालू करून पळून चाललेला दिसून आला असून त्याच्या घरात ललिता हिचा मृतदेह व त्याच्या शेजारी एक दीड वर्षाची मुलगी दिसली. त्यानंतर त्यांनी इतरांना सांगून पोलिसांना कल्पना दिली.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर , पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस अंमलदार दिपक पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.