शिरूर विशेष प्रतिनिधी
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील वागदरे वस्तीनजीक घोणस या जातीच्या सापाने हरीभाऊ वागदरे यांच्या दुभत्या जर्शी गायीच्या तोंडास चावा घेतल्याने त्या गाईचा विषबाधेने तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वागदरे वस्तीत राहणारे वागदरे यांचे कुटुंबातील ओंकार हा नेहमी प्रमाणे जवळील उसाच्या शेतीनजीकच्या मोकळ्या रानात जनावरे चारीत असताना उसाच्या कडेला चरत असलेल्या एका दुभत्या गायीस घोणस सारख्या अति विषारी सर्पाचा तोंडास दंश झाला. व गायीचा काही वेळातच दुर्दैवी मृत्यू झाला.ही पहिलारू गाय दररोज सतरा लिटर दूध देणारी होती.तिचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याने सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी ओंकार यांनी सांगितले.
कवठे गावकामगार तलाठी ललिता वाघमारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असून पुढील कार्यवाही करून नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी दिली.
या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आधीच बिबट्यांचा वावर आणि त्याचबरोबर डिंभा धरणाच्या कॅनॉल व नदी पात्रामधून विषारी सर्प या भागात मोठया प्रमाणावर येत आहे. त्यामुळे नागरीकांची व शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
" सर्प दंशाने गायीचा मृत्यू झाल्याची घटना नक्कीच दुर्दैवी आहे.शेतकऱयांनी उसाच्या कडेला आपली जनावरे चरावयास नेताना बिबट्यापासून आणि सापांपासून वाचण्यासाठी जनावरांची व आपली दक्षता घेत सुरक्षितता म्हणून हातात काठी, मोबाईलचा आवाज सुरु ठेवावा. मेंढपाळ व शेतकऱ्यांनी गवतातून चालत असताना शक्यतो बुटाचा वापर करावा.
**– मनोहर म्हसेकर – वनपरिक्षेत्र ** अधिकारी,शिरूर