शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा व्हावा असं प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं त्यामुळे विद्यार्थी उच्च पदावर पोहोचल्यास सर्वाधिक आनंद शिक्षकाला होत असल्याचे प्रतिपादन कौशल्य व उद्योजकता विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या वतीने पुणे येथील सेवासदन इंग्लिश स्कूलमध्ये राज्यभरातील महासंघाच्या सेवानिवृत्त पदाधिकाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत निनाळे होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांच्यात समन्वय असेल तर व्यवसाय शिक्षण हे निश्चितच सर्वोत्कृष्ट आहे. व्यवसाय अभ्यासक्रमात काम करणारे बहुतांश शिक्षक हे खऱ्या अर्थाने रत्न आहेत त्यामुळेच व्यवसाय शिक्षण नावारूपाला आले आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाच्या आधारे विविध क्षेत्रात त्यांचं कौशल्य दाखवावे असे आवाहनही याप्रसंगी सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी केले.
या कार्यक्रमात राज्यभरातील सेवानिवृत्त झालेल्या महासंघाच्या ३९ पदाधिकाऱ्यांचा सहसंचालक निनाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास महासंघाचे अध्यक्ष प्रा.सिद्धार्थ जाधव, महासचिव प्रा.विद्याधर गोडबोले, कार्याध्यक्ष प्रा.विजयसिंह सिसोदिया, कार्याध्यक्ष प्रा.रमेश साळुंखे, उपाध्यक्ष प्रा.सुधीर ढवळी, माजी अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर, विभागीय सचिव प्रा.अनिल चिखले, महासंघ सचिव प्रा.प्रदीप खांडेकर, जिल्हाध्यक्ष प्रा.संजय कामठे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.जनार्दन जाधव, प्रा.अरुण शिंदे, प्रा.विलास भोसले, प्रा. खुटवड, प्रा.गाणार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महासंघाचे राज्याचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या या योजनेचा तसेच महासंघाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल चिखली यांनी केले. प्रा. संध्या वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.गाढवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.