सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
भारतात आजपर्यंत शिक्षण बदलाबासाठी तीन वेळा आयोग नेमले गेले. इंग्रजांच्या काळात मॅकेलेचा आयोग, १९६४ मध्ये कोठारी आयोग, १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या काळातील श्याम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालील आयोग. आता केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मंजूर केले आहे. स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल झाले. श्याम पित्रोदा यांच्या अध्यक्षते खालील आयोगाने संगणक क्षेत्रास महत्त्व प्राप्त करून दिल्यामुळे आज जगातील अनेक प्रगत देशात आयटी क्षेत्रामध्ये प्रमुख पदावर भारतीय लोक असल्याचे दिसून येते. हे १९६४ च्या आयोगाचे फलित आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल व गरजा लक्षात घेऊन दर दहा वर्षांनी शिक्षण आयोग नियमावा असे धोरण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले होते. परंतु तदनंतर 34 वर्षाने हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संमत करण्यात आले आहे. असे असले तरी या धोरणामध्ये सर्वंकष विचार करून शिक्षण स्वतःच्या आवडीप्रमाणे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे हा विचार केला आहे. या धोरणाचे उद्दिष्टच शिक्षणातून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या मूलभूत क्षमता आणि त्याबरोबरच चिकित्सक विचार, समस्यांचे निराकरण करण्याची अतिउच्च क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून विद्यार्थ्यांच्यात नैतिक, सामाजिक व भावनिक प्रवृत्ती निर्माण करणे हे आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रती संवेदनशील होऊन त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. असे विचार सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी यांनी व्यक्त केले. ते पुरंदर तालुक्यातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिंपळे येथे संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण, पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघ यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या एक दिवशीय कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते म्हणाले विद्यार्थ्यापेक्षा शिक्षकाचे, शिक्षकापेक्षा मुख्याध्यापकाचे व मुख्याध्यापकापेक्षा संस्थाचालकाचे ज्ञान हे अधिक असले पाहिजे तरच शिक्षण प्रक्रिया गतिमान होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवण्यापेक्षा ज्ञानार्थी बनवावे यासाठी त्यांना अभ्यासक्रमाबाहेर जाऊन अवांतर ज्ञान द्यावे. या कार्यक्रमात जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय गवळी तसेच अविनाश ताकवले यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात तालुक्यातील मुख्याध्यापक मधुकर सकुंडे-वाघापूर, जालिंदर जगताप-जेऊर, पांडुरंग पाटील-काळदरी, गुलाबराव बोराटे-दिवे तर शिक्षक योगिनी शेवते-परिंचे, प्रगती मेमाणे-पानवडी, वैशाली यादव-वनपुरी, छाया पोटे-जेजुरी, रोहिदास इंगळे-खळद, सुनील जाधव-माळशिरस, विनय तांबे- निरा, लक्ष्मण गोळे-जवळ अर्जुन, संजय शेडगे-हिवरे, रमेश जाधव-पिंपळे, मोहनलाल निगडे-जवळ अर्जुन, नियोजन ताकवले -यादववाडी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास शांताराम पोमण, कुंडलिक मेमाणे,बाळासाहेब मुळीक,संजय धुमाळ, प्रल्हाद कारकर, मधुकर जगताप, तालुक्यातील सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी घोगरे यांनी केले, सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडे व सचिन धनवट यांनी तर आभार वसंत ताकवले यांनी मानले.