रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
वाघाळे (तालुका शिरूर) येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने पत्रव्यवहारही करण्यात आला आहे मात्र अद्यापही वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून देण्यात आला नाही.
बिबट्याच्या उच्छादामुळे व शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन-तीन घटनांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे बिबट्याच्या भीतीमुळे शेताची कामे करणे मुश्कील होऊन बसले आहे. एकटी महिला किंवा पुरुष शेतामध्ये कामात करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच आता बिबट्या शेताजवळील घरांवरती पाळत ठेवून जानावरांवरती हल्ला करू लागला आहे.
वाघाळे येथील रोहिदास शेळके यांच्या शेळीला बिबट्याने पकडले असता रोहिदास शेळके यांनी प्रसंगावधान राखुन बिबट्याला हुसकून लावले. माञ बिबट्याच्या तोंडाला शेळीचे रक्त लागल्यामुळे बिबट्या घरा भोवती सारखाच घिरट्या घालू लागल्यामुळे शेळके कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तरी बिबट्याला पकडण्यासाठी वाघाळे परिसरात दोन ते तीन पिंजरे उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी वाघाळे गावच्या सरपंच नलिनी स्वप्निल थोरात यांनी केली आहे.