शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मूल्यहीन राजकारणाने संविधानाला तडे जात आहेत ही खेदाची बाब असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.यशवंत पाटणे यांनी केले.
पौड रोड (कोथरूड) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सभागृहात संस्था वर्धापनदिनानिमित्त आयोजीत व्याख्यानमालेत संस्कार, संस्कृती आणि शिक्षणात मूल्य शिक्षणाचे महत्व या विषयावर डॉ.यशवंत पाटणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे होते. सद्यस्थितीतील राजकारणावर बोलताना डॉ.यशवंत पाटणे यांनी मूल्यहीन राजकारण सुरू असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की जीवन क्षमतांचा विकास करणे म्हणजेच शिक्षण होय. ज्ञान संस्कृती ही शिक्षकांच्या शब्दातून फुलत असते. ज्ञान व श्रम यांचं नातं जोडून कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचीही जबाबदारीही शिक्षकांवर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असते. जीवनात संधी आल्यानंतर संधीचं सोनं करणारा सर्वात लायक व यशस्वी ठरतो. विचित्र चित्रामध्ये ज्याला रंग भरता येतात त्याचे जीवन सुंदर होते. गुणांची टक्केवारी म्हणजेच गुणवत्ता नसून टक्के-टोपणे खाण्यातच खरी गुणवत्ता असते. त्यामुळे व्यावहारिक जीवनात तापून सलाखून निघालेली व्यक्तीच यशस्वी ठरत असते. संस्कार व कृती यांचा मेळ म्हणजे संस्कृती असून भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले. शिकायला व शिकवायला चांगली शैक्षणिक संस्था मिळण्यास भाग्य लागते असे गौरवोद्गार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाविषयी बोलताना त्यांनी काढले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड.संदीप कदम, खजिनदार ऍड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव, साहित्यिक डॉ. वि.दा.पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या विविध महाविद्यालयातील, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर व विद्यार्थी व्याख्यानमालेत ऑफलाइन व ऑनलाइन सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे मानद सचिव ऍड.संदीप कदम यांनी केले. माया माईनकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपसचिव एल.एम.पवार यांनी आभार मानले.