शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिरुर तालुक्याने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखावी असे आवाहन शिरुरचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी केले.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती शिरूर आणि शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी मार्गदर्शक शिक्षकांची तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेसाठी तालुक्यातून प्रत्येक शाळेतील दोन शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की शिरूर तालुक्यातील प्रत्येक शाळेने किमान पंचवीस टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसवावेत. तालुक्याची उज्वल परंपरा कायम ठेवावी असे आवहनही त्यांनी केले. मुख्याध्यापक संघाचे सचिव मारूती कदम यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेत तज्ञ मार्गदर्शक तयार झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा प्राथमिक विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय सन्मान होत असतो तसा माध्यमिक विभागातर्फे होत नाही त्यासाठी पुढील वर्षापासून माध्यमिक विभागातर्फे सर्वांचा गुणगौरव करण्यासाठी मुख्याध्यापक संघ पाठपुरावा करणार असल्याचे मत शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून कल्याण कडेकर, बाळासाहेब डांगे, शिवाजी शेळके, बोराटे सर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी विषयतज्ञ प्रदिप देवकाते ,कल्याणकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती कदम यांनी केले तर दिपक गुजर यांनी आभार मानले.