सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
.दिवाळीत सर्वात महत्वाचा दिवस असलेल्या नरक चतुर्दशीला घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. या झाडू ( लक्ष्मी ) उत्पादनावर यंदा अतिवृष्टीने मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे केवळ याच व्यवसायावर अवलंबून असून उत्पादन कमी झाल्याने घरोघरी लक्ष्मी पूजन झाले तरी उत्पादकांवर मात्र उपासमारीची वेळ आल्याने पुरंदर तालुक्यातील लक्ष्मी उत्पादक आणि विक्रेते चिंतेत आहेत.
यावर्षी सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. परंतु नंतर सलग पाऊस झाल्याने लक्ष्मी निर्मितीसाठी लागणाऱ्या वृक्षांचे जोरदार उत्पादन झाले. त्यामुळे यंदा लक्ष्मीची निर्मिती चांगली होवून चार पैसे मिळतील असे वाटत होते. परंतु पावसाळा संपून परतीला सुरुवात झाली तरी हलायचे नाव घेईना. दरवर्षी पावसाभावी कच्चा माल मिळत नव्हता. तर यंदा कच्च्या मालाचे विक्रमी उत्पादन असताना पावसामुळे झाडू निर्मिती मध्ये अडथळा येत होता. झाडूची निर्मिती केली तरी सूर्य प्रकाश आणि कडक उन्ह नसल्याने केरसुणी तयार केल्यावर वाळणार कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भर पावसात शेतातून आणि रानावनातून कच्चा माल तोडून आणणे तसेच घरी आणल्यावर त्यावर प्रक्रिया करण्यास पोषक वातावरण नसल्याने उत्पादन प्रक्रियेवर प्रचंड परिणाम झाला. दरवर्षी एका कुटुंबाकडून हजारो झाडू तयार करून त्याची विक्री केली जात होती. मात्र यंदा केवळ दोनशे ते तीनशे याप्रमाणेच तयार झाले. विशेष म्हणजे दिवाळीतील उलाढालीवर पुढील आर्थिक गणित अवलंबून असते. परंतु यंदा सर्वच गणित बिघडल्याने आर्थिक नियोजन कसे करणार आणि दिवाळी कशी साजरी करणार ? अशी खंत कुंभारवळण येथील लक्ष्मी उत्पादक राजाभाऊ नेटके यांनी व्यक्त केली आहे.
उदाचीवाडी येथील संतोष नेटके, यांनी सांगितले कि, मी स्वतः अपंग असल्याने काही काम करता येत नाही. तसेच शेती नसल्याने शेतातील उपन्न नाही.लक्ष्मी तयार करून ग्रामीण भागात घरोघरी विकून त्यापासून मिळणाऱ्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. परंतु यंदा प्रचंड पाऊस असल्याने मालच तयार करता आला नाही. त्यामुळे कोणतेच उत्पन्न नसल्याने दिवाळी कशी करायची अशा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी प्रतिक्रिया संतोष नेटके यांनी दिली आहे.