शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील चाकण रोड जि.प.शाळेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी शिक्रापूर ग्रामपंचायतीकडे मुख्याध्यापकांनी केली होती परंतु साहित्य मिळण्यास विलंब होत असल्याने शिक्रापुरातील युवक शाळेच्या मदतीस धावून आले व या युवकांनी शाळेला आवश्यक असलेले साहित्य दिले.
शिक्रापूर येथील चाकण रोड जि.प.शाळेने ग्रामपंचायतीकडे पाण्याची टाकी, बसकर पट्टया, माईक, माईक स्टँड, डायस, खुर्च्या, टेबल, सतरंज्या, सिलिंग फॅन, कपाट आदी साहित्याची मागणी केली होती. मात्र मागणी करूनही लवकर वस्तू मिळाल्या नाहीत व प्रतिसादही मिळाला नाही त्यामुळे 'आपली शाळा आपली जबाबदारी' या उक्तीप्रमाणे येथील तरुणांनी एकजूट केली व शाळेला आवश्यक साहित्य दिले. शैलेश करंजे, बंटी पवार,स्वप्नील मांढरे, अक्षय मांढरे, जालिंदर मांढरे, सुजित जाधव, विकास नरके, संजय भुजबळ, सागर शिंदे, अक्षय दळवी, ऋषी केवटे, दत्ता भुजबळ,
अंकुश घारे आदी युवकांनी एकत्र येत शाळेला आवश्यक असलेल्या वस्तू भेटस्वरूपात दिल्या. तरुणांचा हा उपक्रम स्तुत्य व वाखण्यासारखा आहे. तरुणांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. मात्र ग्रामपंचायतीने जबाबदारी झटकली का हा देखील संशोधनाचा विषय असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.