सोनगड किल्ल्याच्या घेऱ्यात सापडले दुर्लक्षित लेणे,साद सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने आणले प्रकाशात.

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक 
         किल्ले सोनगडच्या मोहोप्रे गावच्या दिशेने असणाऱ्या डोंगराच्या मध्यावर कातळात असणारे काळाच्या हे प्राचीन लेणे संस्थेने आयोजीत केलेल्या संवर्धन मोहिमेत गाळमुक्त करण्यात आले.     
काही वर्षे अगोदर साद सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने हाती घेतलेल्या 'शोध अपरिचित ऐतिहासीक स्थळांचा' या अभियानांतर्गत संस्थेचे सभासद अशोक उम्राटकर यांनी  हे लेणे निदर्शनास आणून दिले होते. त्यांनतर,केतन फुलपगारे यांनी या स्थळी पुन्हा एकदा जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून मोहोप्रे आणि गांधारपाले गावातील ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून लेणे असणाऱ्या या अनवट जागेबद्दल माहिती घेतली.
एक खोली असणाऱ्या स्वरूपात मोहोप्रे लेण्याच्या समोरच्या भागाची काळाच्या ओघात थोडीफार पडझड झालेली आहे.या मूळ लेण्याचे डाव्या बाजूला असणारे प्रवेशद्वार हे 5 फूट उंच आणि 4 फूट रुंदीचे असून त्याच्या उजव्या बाजूला 2 चौरस फुटांची खिडकी असावी असे अंदाज लावता येतो.खिडकी असणारा कातळभाग हा कोसळला आहे,भिंतीचा काही भाग अधांतरी राहिल्याने वैशिषट्यपुर्ण रचना निर्माण झाली आहे.मुख्य लेणे हे लांबी 10 फूट,रुंदी 10 फूट, उंची 8 फूट असे साधारण चौरस आकारात हे लेणे खोदलेले आहे.लेण्याच्या डाव्या बाजूला समांतर 2 फूट उंचीचे बाकडे खोदत असताना ते L आकारात समोरच्या भिंतीलगत कोरले आहे.लेण्याच्या उजव्या कोपऱ्यातील  कोनाडा 3 फूट आत काटकोनात खोदलेला आहे तिथे देखील 2 फूट उंचीचे बाकडे कोरलेले आहे.     
एकंदरीत,या लेण्याची रचना पाहता हे लेणे गांधारपाले लेणीसमूह खोदला त्या काळातीलच म्हणजे इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांतील असावे असे येथे असणाऱ्या शिलालेखावरून स्पष्ट होते.शिलालेख हा मुख्य लेण्याच्या आतील भागतील समोरच्या भिंतीवर डाव्या बाजूला छताजवळ आहे असून तो त्याकाळात प्रचलित असणाऱ्या ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेतील आहे. शिलालेखाच्या पहिल्या ओळीत 26 अक्षरे आणि दुसऱ्या ओळीत 8 अक्षरे आहेत.भिंतीवर आणि शिलालेखावर  सफेद रंगाचा क्षार जमा झाला असल्याने काही अक्षरे अस्पष्ट झालेली आहेत, तरीही यातील बरीच अक्षरे ओळखू येतात,त्यांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.
शेकडो वर्षे ही लेणी वापरात नसल्याने झाडीझुडूपात गुडूप झाली होती,पावसाचा मारा झेलत असताना त्यात फूटभर गाळ साचला होता.साद सह्याद्री प्रतिष्ठाना तर्फे निकेत आयरे,संकेत ढेकणे,महेश चौधरी,दत्ताराम मोरे,कल्पेश सागवेकर, अजय पिंगळे,सुयोग पाटील,महेश जाधव आणि केतन फुलपगारे यांनी या संवर्धन मोहिमेत श्रमदान केले.त्याद्वारे या लेण्यास पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
'रायगड कॉलेज ऑफ फार्मसी' मोहोप्रे येथून सोनगड येथे जाणारी पायवाट आहे,या वाटेने जात असताना उजव्या बाजूस असणाऱ्या डोंगरात हे लेणे खोदलेले आहे.मोहोप्रे गावातून सोनगडावर जाणारी पायवाट पुन्हा प्रचलित झाल्यास मोहोप्रे गावाला अजून एक नवी ओळख मिळेल.सोनगड चढाई करत असताना नवीन सापडलेल्या या प्राचीन लेण्यात एक थांबा नक्कीच घेता येईल असे संस्थेचे अध्यक्ष प्रतिक मोरे यांच्याकडून सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!