फर्निचर ई टेंडर फाईल आव्हाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयातून गेली चोरीला,लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; ग्रामसेवकांनी दिली फिर्याद
प्रतिनिधी विनायक साबळे
आव्हाळवाडी (तालुका हवेली) ग्रामपंचायत कार्यालयातून सन २०२०-२१ सालाची फर्निचर ई टेंडर फाईल चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामसेवकांनी पोलिसात फिर्याद दिली असून फाईल चोरीचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये माहिती अधिकारात सन २०२०-२१ सालाची फर्निचर ई टेंडर माहिती मागविण्यात आली होती. ग्रामपंचायतीने सदरची फाईलमधील माहिती दिली देखील होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्वीचे ग्रामसेवक तुकाराम पाटील यांनी फोनद्वारे क्लार्कला फर्निचर फाईलच्या वर्क ऑर्डरची प्रत पाहिजे असल्याचे कळविले होते. क्लार्क यांनी सध्याचे ग्रामसेवक अतुल कोहिनकर यांना फाईलबद्दल सांगितले असता ग्रामसेवक यांच्या ड्रॉवरमध्ये फाईल मिळून आली नाही. फाईलचा शोध घेतला असता सापडली नसल्याने संबंधित फाईल चोरून नेल्याची खात्री झाली. याप्रकरणी ग्रामसेवक अतुल कोहिनकर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.