गुनाट प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील दत्त पंढरी म्हणुन ओळखले जाणारे श्री क्षेत्र दत्त देवस्थान गुनाट येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ (दि.१/१२/२०२२) गुरुवार रोजी ते सांगता दि.८/१२/२०२२)गुरुवार पर्यंत होत आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात प्रथम वर्षी बबन रोकडे मिस्तरी आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी १९९२ साली सुरुवात केली. पुढे जाऊन या सप्ताह सोहळ्याला सर्व गुनाट ग्रामस्थांच्या मदतीने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले अशी अख्यांकिका सांगितली जाते त्याचप्रमाणे गुनाट या गावातील वैभवात भर टाकणारा हा दत्त महाराजांचा सोहळा संपूर्ण पुणे जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे ३० वर्षे या सोहळ्याला पूर्ण होत आहे प्रथम अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात कलश पूजन, विना पूजन, ज्ञानेश्वरी पारायण पूजन गावचे प्रथम नागरिक सरपंच संदेश करपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व वारकरी, सेवेकरी व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी उपस्थित होते.
प्रतिवर्षीप्रमाणे दैनिक कार्यक्रम- अखंड विना नामस्मरण, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर याप्रमाणे नियमित कार्यक्रम होत असतात (दि.७) बुधवार रोजी दु.३ ते ६ वाजता संपूर्ण गुनाट नगरीत पालखी मार्गावर घरासमोर रांगोळी, फुलांची पुष्परूष्टी करत सर्व एकोपा जपत भव्य दिंडी सोहळा उत्सव होत असतो या दिंडी सोहळ्यामध्ये परिसरातील सर्व भाविक दत्तभक्त तसेच पाहुणे मंडळी व गुनाट ग्रामस्थ उपस्थित असतात (दि.८) गुरुवार रोजी पहाटे ४ वाजता दत्त जन्म सोहळा संपन्न होऊन मोठ्या दिमाखदार व आनंदीमय वातावरणात फटाक्याच्या आताषबाजीने पार पडतो या जन्म सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक-भक्त गुनाट नगरीत दत्त दर्शनासाठी मनोभावी येत असतात हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते तसेच (दि.८) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये काल्याचे किर्तन व काल्याचा महाप्रसाद होणार आहे. विशेष म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये अन्नछत्राचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात दररोज होत असतो सर्वात शेवटी पारंपारिक लळीत संग्रहाचा कार्यक्रम होऊन सांगता होते.