लोणी काळभोर चंद्रकांत दुंडे
कांद्याला बाजार नाही, भाजीपाल्याला बाजार नाही, फळांना बाजार नाही. कर्ज वसुलीसाठी मार्च एंडीग मूळे शेतकऱ्यांना बँकेच्या वसुलीसाठी नोटीसा येत आहेत. वसुलीसाठी बँकांची पथके शेतकऱ्यांच्या घरी जात आहेत. तगादा लावत आहेत जप्तीची भीती घातली जात आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी पाहूणे मंडळींकडून हात उसणे,दागदागिने मोडून किंवा गहाण ठेवून, किंवा प्रसंगी खासगी सावकारांकडून टक्केवारीने काढून कर्जाचा भरणा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जुने नवीन करण्यासाठी दहा पंधरा दिवसांसाठी पुर्ण महिन्याचे व्याज भरून पैशाची उपलब्धता करावी लागत आहे.शेतकऱ्यांना कर्जावर शुन्य टक्के व्याज असताना गेल्या वर्षी भरलेले व्याज परत अद्याप मिळाले नाही. परत यंदाही व्याज भरावे लागल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसताना शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेदिवस वाढच होताना दिसत आहे.
खते औषधे बि.बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच डिझेल दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एक एकर जमीन नांगरणीसाठी चार हजार रुपये मोजावे लागत आहे.तसेच दुहेरी फणणीसाठी अडीच हजार रुपये, पाळी किंवा सारे काढण्यासाठी साडे बाराशे रुपये, रान ओढण्यासाठी तीन हजार रुपये, त्यापुढील खर्च कोणते पीक करावयाचे त्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे बि बियाण्याचे दरही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. परत शेणखत ,कोंबडीखत, कचराखत,टाकायचे म्हटले तर एकरी तीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च येतो आहे. खुरपणीचा मजुरी दर हा दोनशे ते अडीचशे रुपयांवर पोहोचला आहे. ईळ आणि सवय म्हणजे साधारण आठ ते पाच तेही मध्ये एक तास जेवणासाठी सुट्टी तीनशे रुपये मजुरीचा दर झाला आहे.गडी ठेवायचा म्हटले तर कमीत कमी पाचशे रुपयांच्या पुढे म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये आणायचे कोठून अशी परिस्थिती आहे. तणशकांच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यातच तणनाशकांच्या वेगवेगळ्या कंपनी बाजारात आल्या असल्याने चांगल्या कंपन्यांच्या किमती जास्त असल्याने व त्यावर दुकानदारांना मार्जिन कमी मिळत असल्याने दुकानदार जास्त मार्जिन मिळत असलेल्या कंपन्यांची तणनाशके, खते शेतकऱ्यांना विकत असुन भरघोस नफा कमवत आहेत. आणि फसवणूक मात्र शेतकऱ्यांची होत आहे.चांगल्या कंपनीच्या खते औषधे यामध्ये मार्जिन कमी मिळते म्हणून ते जाणुबुजून शेतकऱ्यांना दिले जात नाही. तणननाशकांनीही तणच जळत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत तसेच खते औषधे, किटकनाशके यामधूनही फसवणूक होत आहे.हेही डुप्लिकेट मिळत आहे.
एकुणच शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. आणि शेतकऱ्यांना घर चालवणे कठीण होऊन बसले आहे. शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च करणे परवडत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची अवस्था निर्माण झाली आहे. उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न रखडली आहेत शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे.कारण शेतकऱ्यांचे जीवन हे अतिशय कष्टमय बनले आहे.मोठ्या अपेक्षेने निवडुन दिलेले सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी एकमेकावर आरोप करण्यात मग्न आहेत. महागाई दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. तरी शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा अशी अपेक्षा बळीराजा करत आहे. तसेच शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालावर एजंटगिरीची मोठी साखळी निर्माण झाली आहे. शेतकरी बाजारात सुद्धा एजंट शिवाय मालाची विक्री होत नाही शेतकरी बाजारातच बाजार फुटण्याच्या अगोदरच दुबार विक्री करणारे एजंट सक्रिय होऊन तास दोन तासात हजारो रुपये कमवत आहेत. आणि चांगल्या प्रतिचा माल अगोदरच खरेदी केल्याने आणि मोबाईल फोनवर बाजार फिक्स करून बाजार सुरू होण्यापूर्वीच विक्री करुन मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होत नसल्याचे भीषण वास्तव आहे.आणि हे दुबार विक्री करणारे स्थानिक परिसरातील असल्याने पाहुणे मंडळी, नातेवाईक किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून बाजार समिती यांचेवर कारवाई करत नाहीत.शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांची नावे सांगा किंवा त्यांची नावांची यादी द्या , त्यांनी शेतातून माल खरेदी करुन आणला आहे, आम्ही शेतकरी आणि दुबार विक्री करणारा व्यापारी कसा ओळखायचा अशी उत्तरे दिली जातात.तक्रार करणाऱ्यांना दुबार विक्री करणाऱ्यांकडून दमबाजीही केली जाते.वास्तविक पाहता बाजार समितीचे कर्मचारी, आधिकारी यांना रोजच वर्षानुवर्षे याठिकाणी मालाची विक्री करीत असल्याने संपूर्ण दुबार विक्री करणाऱ्यांची पुर्णपणे कल्पना असते परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे करणे सोपे नसते खासगी एजंट अगदी या ठिकाणचे मालक असल्याचे तोऱ्यात वावरत असतात . आणि शेतकरी कंगाल अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांची मोठी लुट खुलेआम सुरू आहे. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.