लोणी काळभोर प्रतिनिधी
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील निवासी मिळकतींना मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींकडे नोंद असलेल्या आणि २०२१ नंतर महापालिकेकडे नोंद झालेल्या मिळकतींना ही सवलत दिली जाणार आहे.
घरमालक स्वत: रहात असलेल्या मिळकतींना महापालिकेकडून मिळकतकरामध्ये ४० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यासंदर्भातील ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने १९७० मध्ये केला होता. मात्र, ही सवलत रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ही सवलत कायम ठेवण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. चालू आर्थिक वर्षापासून (१ एप्रिल) या सवलतीची अंमलबजावणी होणार असून त्याबाबतची प्रक्रिया कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून करण्यात सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावांमध्ये १ लाख ८२ हजार १६४ निवासी मिळकती, १४ हजार ३५१ बिगर निवासी मिळकती असून ७०० मोकळ्या जागा आहेत. ही गावे २०२१ मध्ये महापालिकेत आली असल्याने त्यांना ४० टक्के सवलत यापूर्वी दिलेली नव्हती. मात्र, आता ही सवलत दिली जाणार आहे.
नवीन गावे समाविष्ट झाल्यानंतर पहिल्या वर्षी एकूण कराच्या २० टक्के, दुसऱ्या वर्षी ४० टक्के, तिसऱ्या वर्षी ६० टक्के, चौथ्या वर्षी ८० आणि पाचव्या वर्षी १०० टक्के कर आकारणी करण्यात येत आहे, असे मिळकतकर विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी सांगितले. सवलतीचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारकांना १५ नोव्हेंबर पूर्वी पर्यंत पीटी-३ अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दाखल करणे बंधकानकारक आहे.