रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
दुर्गजागर प्रतिष्ठानकडून मालेगाव ( नाशिक ) येथील किल्ले गाळणा मुख्य दरवाजावर महाव्दार अर्पण सोहळा साजरा करण्यात आला. हा अविस्मरणिय सोहळा याची देही, याची डोळा पारणे फेडण्यासारखा अद्भूतप्रकारे पार पडला.
सामर्थ्य आहे चळवळीचे , जो तो करील तयाचे या सुभाषित खऱ्या अर्थाने सार्थ ठरला. शिवराय असे शक्तीदाता , खरंच शिवराय हे शक्तीदाताच आहेत.. त्यांंचा पराक्रम, त्यांचा इतिहास, त्यांचे विचार नेहमीच प्रेरणा देत आलेत.. हीच प्रेरणा घेऊन त्यांच्या विजयाचे साक्षीदार हे गडकिल्ले.. असाच एक त्यांचा शिलेदार मालेगावचा किल्ले गाळणा येथे महाव्दार बसविण्याचा संकल्प दुर्गजागर प्रतिष्ठानने केला आणि नाशिकचे मावळे अंताराम शिंदे , राकेश खैरनार आणि ऋषिकेश दरेकर व टीमने ही जबाबदारी खांद्यावर घेतली आणि मोठ्या जोमाने काम करून ती तडीसही नेली. दुर्गजागर प्रतिष्ठाने संस्थापक संतोष जगताप, अध्यक्ष विनोद झेंडे यांनी हा उचललेला विडा शर्थीने , जिद्दीने सर्वांना सोबत घेऊन यशस्वी केला. या कामी नाशिक, पुणे, रायगड विभागातील सर्वच मावळ्यांनी व सर्व देणगीदारांनी मोलाची कामगिरी केली.
किल्ले गाळणाला महाव्दार बसवून त्याचे वैभव परत करण्याचे काम आज दुर्गजागर प्रतिष्ठानने केले आहे. सह्याद्रीच्या या शिलेदाराच्या शेल्यात आणखी एक मानाचा तुरा शोभला आहे. दुर्गजागरचा हा सोहळा खूप सुंदर झाला. गडावर रात्री देव देवतांचा जागर गोंधळ घालण्यात आला, तसेच गावभर ढोल ताश्यांच्या गजरात व शिवराय व मावळ्यांच्या पात्रांसह गावभर शिवप्रतिमेची पालखीत गावभर मिरवणूक करण्यात आली. भंडार उडवून, शिवरायांचा जयघोष करून दाहीदिशांना साक्षी ठेवून हा सोहळा अविस्मरणिय केला. यासाठी झटणाऱ्या व निधी देणाऱ्या प्रत्येक हातांचा दुर्गजागर प्रतिष्ठान ऋणी राहिल असे संतोष जगताप यांनी सांगितले.