सुनील भंडारे पाटील
हवेली तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने गुणवंत गुरूजन- विद्यार्थी सन्मान सोहळा नुकताच पार पडला. यात वढू खुर्द (ता हवेली) येथील उपक्रमशील शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना अशोक म्हसे यांना पुणे येथे सभापती प्रविण झांबरे यांच्या हस्ते गुणवंत गुरुजन पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी सोपान शेलार, संदीप गायकवाड आणि वैशाली वाडकर
आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
येथील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू खुर्दचा यंदाच्या वर्षाचा शिष्यवृत्ती निकाल शंभर टक्के लावत दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीत आले असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश मिळवले आहे. यात विश्वास राम जयस्वार (240), पवन मुन्ना लाल गौतम (238) या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित करत यशाची उज्वल परंपरा कायम राखत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. येथील उपक्रमशील शिक्षिका मिना अशोक म्हसे यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे.
हवेली तालुक्यात वढू खुर्द गावात मिना म्हसे यांनी वर्षभर एकही सुट्टी न घेता शिष्यवृत्तीचे जादा तास घेतले. एवढेच नव्हे तर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मुलांचा शिष्यवृत्ती सराव घेऊन वर्षभरात त्यांनी मुलांच्या सुमारे शंभर प्रश्नपञिका सोडवून घेतल्या. याचेच फलित म्हणून वढू खुर्द मधील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत येण्याचा बहुमान मिळाला आहे.
याआधी तीन वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील पाच मुले शिष्यवृत्तीत आणून गेली साठ वर्षात प्रथमच त्यांनी शिष्यवृत्तीची परंपरा शाळेत सुरू केली. त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर शिक्षकांनीही शिष्यवृत्तीतची परंपरा आजतागायत चालू ठेवली आहे. यावर्षी बदलीला पात्र असूनही त्यांनी मुलांसाठी अविरत कष्ट घेतले. परंतु शिष्यवृत्तीची परंपरा खंडित होऊ दिली नाही. घरादारावर तुळशीपत्र ठेवून वर्षभर मुलांसाठी कष्ट घेत शिष्यवृत्ती परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.