सणसवाडी ज्ञानेश्वर मिरगुले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी व शहरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा तळागाळापर्यंत पोहोचाव्यात आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे या उद्देशाने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नेहरू सायन्स सेंटर मुंबई व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या प्रयोगशाळेचे आयोजन ग्रामीण भागातील शाळांमध्ये मोफत केले जाते.
मुलांना लहान वयातच वेगवेगळ्या प्रयोगांच्या संधी उपलब्ध करून देऊन या विषयांची गोडी लावली तर त्यातून पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ, अभियंता, डॉक्टर नक्कीच घडू शकतात. फिरत्या प्रयोग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगाचे प्रात्यक्षिक व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल त्यानिमित्ताने होऊन त्यांच्या विचारांना चालना मिळते.
माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडीच्या विद्यालयात विज्ञानाचे विविध उपक्रम प्रत्येक वर्षी राबविले जातात. विद्यालयातील अनेक विद्यार्थी आजपर्यंत उपकरण व प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय पातळीवर अनेकवेळा गेलेले आहेत. राज्यातील अशाच उपक्रमशील शाळांची निवड नेहरु सायन्स सेंटर द्वारे केली जाते. दि. 27 व 28 रोजी झालेल्या दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचा लाभ विद्यालयातील एकूण चौदाशे विद्यार्थ्यांनी घेतला व प्रयोग समजून घेतले.
या फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, प्राचार्या राधिका मेंगडे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांची माहिती नेहरू सायन्स सेंटर मुंबई चे प्रकल्प अधिकारी ऋषिकेश कदम,. प्रकाश मडिवाल, प्रमोद देशमुख यांनी दिली आणि विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. विज्ञान प्रयोग शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग मोफत पाहण्याची संधी नेहरू सायन्स सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रयोग करता आले ही निश्चितच आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे प्राचार्या राधिका मेंगवडे यांनी सांगितले.
विज्ञान म्हटले की प्रयोग आलेच आणि पुस्तकातील वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांना स्वतः करायला मिळाले तर विद्यार्थ्यांना ती एक पर्वणीच ठरते. नव्या युगातील प्रगतीची अनेक कवाडे विज्ञानातील संशोधनामुळे आज खुली झाली आहेत. त्यामुळे करिअरसाठी आजही विज्ञान विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रयोग पाहिल्यावर त्यांच्यामध्ये विज्ञान विषयाविषयी कुतुहल निर्माण झाले व नवीन काहीतरी करण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण झाली असल्याचे विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे यांनी सांगितले.फिरत्या प्रयोगशाळेच्या आयोजनात विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.