फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल;गुन्हे शाखा युनिट-६ ची धडाकेबाज कामगिरी; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

Bharari News
0
१३ लाख ३९ हजार रुपयांची युवकाची फसवणूक ; फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल;गुन्हे शाखा युनिट-६ ची धडाकेबाज कामगिरी; मोठे रॅकेट असण्याची शक्यता   

वाघोली प्रतिनिधी सोमनाथ आव्हाळे 
     बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून हडपसर मधील युवकाची १३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
१)प्रफुल्ल उबाळे (रा. हडपसर,  पुणे),  २) कमल उबाळे (रा. हडपसर, पुणे), ३) अविनाश कदम (रा. हडपसर, पुणे), ४) सुभाष रसाळ (रा.हडपसर, पुणे) असे फसवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत.   
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध राऊत (वय २२ रा. भागीरथ नगर) हा हडपसर येथे शिक्षण घेत आहे. राऊत याला स्वतःच्या वापरासाठी एक दुचाकी लागत असल्याने त्याने याबाबत त्याचा मित्र दीपक आंधळे यास विचारणा केली. त्यावेळी आंधळे याने प्रफुल्ल उबाळे हा माझ्या ओळखीचा असून त्याचा गाड्या विकण्याचा व्यवसाय असल्याचे सांगून राऊत याची उबाळे याची भेट करून दिली. उबाळे यांनी राऊतला मी श्रीराम फायनान्स व इतर फायनान्सचे काम करतो असे सांगितले. मी तुला या गाड्यांच्या विक्रीच्या व्यवसायात भरपूर पैसे कमवून देईल असे उबाळे याने राऊतला सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर उबाळे यांनी मुंढवा येथील एका फायनान्सच्या गोडाऊनमध्ये नेवून काही गाड्या दाखवल्या. गोडाऊनमध्ये असलेल्या गाड्या आयसीआयसीआय बँकेने जप्त केल्या असून फक्त माझ्या मार्फत विकल्या जातात व गाडी खरेदी केल्यानंतर एक महिन्यानंतर गाडीची कागदपत्रे मिळतात. उबाळेच्या बोलण्यावर विश्वास पटल्याने राऊतने त्याला दुचाकीची मागणी केली.  उबाळे याने ६५ हजार रुपये बाजारभाव असलेली एक दुचाकी ३२ हजार रुपयांना दिल्याने राऊतचा उबाळेवर अजूनच विश्वास निर्माण झाला. त्यानंतर उबाळे हा वेळोवेळी आलिशान गाड्यातून राऊत यास भेटू लागला आणि या गाड्यांच्या व्यवसायातून किती पैसे कमवतो हे सांगत होता. या सर्व गोष्टींवर विश्वास निर्माण झाल्याने राऊतने त्याच्याकडून आणखी एक चारचाकी व सहा दुचाकी इतकी वाहने घेतली व सर्व गाड्यांची पैसे ऑनलाईन स्वरूपात दिले. त्यानंतर उबाळे यांनी व्हॉट्सअॅपवर त्यांना काही  गाड्यांच्या माहितीसह फोटो पाठवले.  
  गाड्यांच्या किंमती बाजार किंमतीपेक्षा कमी असल्याने राऊतने उबाळे यांना कॅश व ऑनलाईन स्वरूपात १३ लाख ३९ हजार रुपये दिले. परंतु ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उबाळेंनी गाड्या व गाड्यांची कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. राऊत हा उबाळे कडे कागदपत्रे मागण्यासाठी जायचा त्यावेळी त्याला उबाळे याचा ड्रायव्हर अविनाश कदम याची भेट व्हायची, त्यावेळी कदम हा आमचा मालक मोठा माणूस आहे, त्याच्या नादी लागू नको त्याचा पार्टनर सुभाष रसाळ आहे. तुझ्यासारखी किती पोर आली आणि गेली त्यांना काही फरक पडत नाही तसेच उबाळे यांची आई एका संघटनेची अध्यक्ष आहे अशा स्वरूपाच्या धमक्या देत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच राऊत याने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. राऊत याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा कोणी वरदहस्त आहे का याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. प्रफुल्ल उबाळे याचेवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके करत आहेत.
सद्यस्थितीत फसवेगिरीचे प्रकार वाढले असून तरुणांनी अमिषाला बळी पडू नये. कोणाची फसवणुक झाली असेल तर निर्भीडपणे संबधित पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोहवा. मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, संभाजी सपटे, प्रतीक लायगुडे, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्फाक मुलानी, ज्योती काळे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!