सुनील भंडारे पाटील
चार दिवस केलेल्या कामाचे पैसे ठेकेदाराने न दिल्यामुळे तसेच कामावरून काढून टाकल्याने झालेल्या वादातून मित्रांनीच एका कामगार तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली-केसनंद रोडवरील सिट्रॉन सोसायटी जवळ लेबर कॅम्प येथे घडली.
शैलेश रमेश मांडगीकर (वय २५, मुळगाव रा. देगलूर, नांदेड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (वय २५, मुळगाव रा. मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटलापुरे (वय २५, मुळगाव रा. नांदेड नाका, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगम चंद्रशेखर धारिया (वय २३, रा. कुशीगर, उत्तरप्रदेश) याने या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोटलापूरे, धारिया, श्रीराम, मांडगीकर कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रॉन सोसायटीजवळ दारु पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, मांडगीकरने श्रीराम आणि कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. याच वादातून मांडगीकर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. यानंतर दोघेही दुचाकीवर घरगुती गॅस सिलेंडरची टाकी घेऊन फरार झाले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करीत आहेत.