लोणी काळभोर अनिकेत मुळीक
हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मांजरी येथील कै. अण्णासाहेब मगर उपबाजार तयार करण्यात आला. असून या बाजारातून शेतकऱ्यांचे हाल चालले असल्याचे दिसून येत आहे. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला असून शेतकरी ते थेट विक्रेते अशी या बाजाराचे स्वरूप आहे.
पण रोज शेतकऱ्यांचा माल घेऊन त्याची कमिशनवर विक्री करुन भरघोस नफा मिळविणारे दुबार विक्रेते या बाजारातून मालामाल झाले असून शेतकरी मात्र उपाशी राहिला आहे .बाजार समितीची या दुबार विक्रेत्यांना पाठबळ असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे . बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर या बाजारात दुबार विक्रेते बंद होतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण झाले उलटे दुबार विक्रेते वाढले असून ते दररोज दहा ते अकरा वाजता येऊन बाजारात स्वतःची जागा असल्यासारखी जागा पकडतात व शेती माल आल्यानंतर तिथे माल ठेवतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर माल विकावा लागतो. बाजारात गेल्यानंतर दुबार विक्रेते बाजार फुटायच्या आधी कमी किमतीत माल घेतात व तोच माल बाजार फुटल्यानंतर विकतात. परिणामी मालाची किंमत बाजार फुटायच्या आतच व्यापारी व दुबार विक्रेते फिक्स करतात .त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव मिळत नाही. त्यानंतर पडत्या भावाने शेतकऱ्यांना तो माल विकावा लागतो. त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन मोठा फटका बसत आहे. मुळात शेतकरी बाजार ही संकल्पनाच यामुळे धोक्यात आली आहे .या दुबार विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही हा बाजार शेतकऱ्यांचा असून शेतकऱ्यांनाच माल ठेवण्यासाठी जागा मिळत नसल्याचे दिसून आले आहे .
दुबार विक्रेते बाजारच्या शेडमध्ये व शेतकरी रस्त्यावर अशी अवस्था या बाजारात झाली आहे. दुबार विक्रेते वर्षानुवर्षी त्याच जागेवर माल विकत असून शेतकरी मात्र आपली मालाचे डाग व पोती इकडे तिकडे ठेवताना दिसत आहे .तोडमाल भेंडी ,दोडकी , कारली व मिरच्या या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये येत असून येथे प्लास्टिक बंदीचा कसलाही गंध दिसत नाही .प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून आल्यामुळे त्या पिशव्या ठोक भावात जात असल्यामुळे त्याचे वजन होत नाही .त्यामुळे बाजार समितीला वजनाची पावती न फाडल्यामुळे नुकसान होत आहे.
भाजीपाला कमी किमतीत घेऊन तो मग दुबार विक्रेते चढ्या भावाने विकतात वास्तविक पाहता दुबार विक्रेत्यांसाठी कसलाही नियम येथे नाही .शेतकरी बाजार ते विक्रेते असा विना मध्यस्थ कारभार यापूर्वी चालायचा परंतु आता दुबार विक्रेते मध्यस्थांची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाताना दिसत आहे. जर कोणी ओरड केली तर दिखाव्यापुर्ती लुटुपुटुची कारवाई केली जाते . आणि दोन दिवसांनी पुन्हा दुबार विक्रेते पांढरा खादीचा शर्ट घालून बाजारात दिसतात.
याबाबत मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता दुबार विक्रेते ही संकल्पना म्हणजे येथेच माल खरेदी करून परत त्याची विक्री करणे होय . त्यामुळे असे प्रकार येथे होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु शेतकऱ्यांनी सांगितले की रोज एकच भाजी तीन ते चार हजार जुड्या विकणारा हा कुठला शेतकरी आहे .त्यामुळे मार्केट समितीने यावर निर्णय घेऊन फक्त शेतकरी ते विक्रेते अशी संकल्पना या बाजारात राबवावी व शेतकऱ्यांना कसे दोन पैसे जास्त मिळतील याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .
शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेला शेतमाल ,शेताची केलेली मेहनत , खते बी बियाणे ,औषध फवारणी करून कष्टाने टाकणीपासुन कापणीपर्यंत त्याची देखभाल करुन जे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याच्या कितीतरी पटीने अधिक उत्पन्न हे दुबार विक्री करणारे मिळवत होते. येथील बाजाराची वेळ दुपारी दोनची आहे. हे दुबार विक्री करणारे व्यापारी बारा ते दोन वाजण्याच्या आसपास माल खरेदी करुन ठेवून नंतर दुपारी दोन नंतर त्याची विक्री करून भरघोस नफा कमवतात असतात आणि रोजच ते विक्री करण्यासाठी हजर असल्याने खरेदीसाठी येणारे व्यापारीही प्रथमतः त्यांचाच माल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होणे कठीण होऊन बसले आहे.