सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (ता हवेली) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये पेरणे गावचे हद्दीत कदम वस्ती जवळील मोकळ्या जागेत चालू असलेल्या गावठी हातभट्टीच्या धंदयावर छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून एकजण फरार झाला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी तपास पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. तपास पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. ९ ऑक्टोबर) पेरणे गावचे हद्दीत कदम वस्ती जवळील मोकळ्या जागेत सुरु असलेल्या हातभट्टीच्या धंदयावर छापा टाकला. त्यामध्ये ७० लिटर दारू जप्त करुन १००० लिटर रसायन, दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप इत्यादी साहित्य ताब्यात घेवून जागीच नष्ट करण्यात आले. हातभट्टी चालकास ताब्यात घेवून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर एकजण फरार झाला आहे. यापूर्वीही लोणीकंद पोलिसांनी मौजे भावडी, पिंपरी सांडस, पेरणे गावचे हद्दीत छापा टाकून हातभट्टी चालकांविरुध्द कारवाई केली होती. पुढील तपास पोना अजित फरांदे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक सिमा ढाकणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोह संदीप तिकोणे, पोना विनायक साळवे, पोना स्वप्निल जाधव, पोना अजित फरांदे यांनी केली आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी धंदे चालू असल्यास लोणीकंद पोलीस स्टेशनशी ९५२७०६९१०० या क्रमांकावर संपर्क करावा. - विश्वजीत काइंगडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद)