सुनील भंडारे पाटील
मराठी समाजाविरोधात अपशब्द तसेच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने योद्धा युवा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. गणेश म्हस्के यांनी लोणीकंद शहर पोलीस स्टेशनमध्ये (पुणे) गुणरत्न निवृत्ती सदावर्ते विरुद्ध लेखी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या सदावर्ते वर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी अॅड. म्हस्के केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवार (१४ ऑक्टोबर २०२३) रोजी दुपारी आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सभा आयोजीत केली होती. सदर सभेसाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच देशातील विविध ठिकाणांवरून असंख्य गोरगरीब मराठा बांधव आरक्षण मिळावे या भावनेने उपस्थित राहीले होते.
सदरील सभा संपल्यानंतर गुणरत्न सदावर्ते याने पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाविरुद्ध अपशब्द वापरले तसेच धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह वक्तव्य करून सभेसाठी उपस्थित राहीलेल्या मराठा समाज बांधवांचा अपमान करून अब्रुनुकसान केले असल्याचे म्हस्के यांनी अर्जात नमूद केले आहे.
सदावर्ते याने मराठा व कुणबी समाजाला रताळं व केळं अशी उपमा देत “लावलं रताळ आलयं केळं असं कधीच झाल नाही” असं वक्तव्य केलं. तसेच मराठा आंदोलन दडपण्यासाठी जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार आहेत अशा अफवा पसरवल्या. तसेच मनोज जरांगेंच्या सभेचा ‘जरांगे जत्रा’ असा उल्लेख केला आहे. जत्रा ही आमच्या हिंदु धर्माच्या देव देवतांची भरत असते, भाविक जत्रेमध्ये धार्मिक भावनेने सहभागी होत असतात. जत्रा ही आमची धार्मिक अस्मीता असून सदावर्तेच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावली गेली असल्याचे तक्रारी अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तसेच आज जत्रेत पॉलीटीकल बॉसचे लॉयल डॉग दिसतात असे वक्तव्य करून सभेसाठी उपस्थित असणाऱ्या मराठा समाज बांधवांना कुत्रा म्हणुन संबोधले. त्यामुळे मराठा समाज बांधवांचा अपमान होऊन अब्रुनुकसान केले आहे. जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये अनेक वारकरी, धर्मप्रचारक आणि महाराज उपस्थित होते. कीर्तनकार महाराजांना हिंदू धर्मामध्ये देवासमान मानले जाते. अशा देवासमान असलेल्या व्यक्तींना कुत्रा म्हणाल्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
अशा प्रकारे अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या तसेच समाजामध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने व धार्मिक भावना दुखावणाऱ्या सदावर्ते वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने योद्धा युवा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. गणेश म्हस्के यांनी लोणीकंद शहर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रारी अर्ज दिला आहे.