हवेली प्रतिनिधी
वाजेवाडी (शिरूर) तालुक्यातील वाजेवाडी/ मांजरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली असून पद्मावती माता ग्रामविकास पॅनल व ग्रामदैवत पद्मावती माता प्रगती पॅनलच्या वतीने जोरदार प्रचार करण्यात आला आहे.
दोन्ही पॅनलला विजयाची खात्री असल्याने गेली आठ दिवस कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचार थांबला असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर जोर दिला जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार थांबला असला तरी मतदारांना मतदानासाठी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांना जोमाने प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असून यशाचे ध्येय गाठण्यासाठी जागरूक राहावे लागेल.
वाजेवाडी/ मांजरेवाडी थेट असणारी सरपंच पदाची ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार असून प्रत्येक उमेदवाराला आपल्याला मिळालेले चिन्ह मतदारांना मतदान करताना लक्षात राहील अशा पद्धतीने समजून द्यावे लागेल. अन्यथा हक्काचे मतदान दुसऱ्याच्या पारड्यात पडायचे.
दोन्ही पॅनलमध्ये उमेदवारांना मिळालेले चिन्ह वेगवेगळे असल्याने व प्रत्येक मतदार सुज्ञ नसल्याने मतदान आपल्याच पॅनलला होईल यासाठी कटाक्षाने प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक पॅनल प्रमुखाने व उमेदवाराने आपल्याच पॅनलला मतदान होईल, असा प्रयत्न केला तरच गृहीत धरलेला विजय सत्यात उतरु शकतो. अन्यथा क्रॉस व्होटिंग झाल्यानंतर मतदानाचा निकाल वेगळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.