लोणी काळभोर प्रतिनिधी
हवेली तालुक्यात सर्वात मोठी असणारी उरुळी कांचन येथील बाजार पेठेत बेशिस्त पार्किंगने रस्ते केले काबीज केले असून नागरिकांना याचा त्रास होताना दिसत आहे . पुणे सोलापूर महामार्गावर एलाईट चौक ते महात्मा गांधी रस्तापर्यंत अनेक बँका व विविध प्रकारची दुकाने असून स्थानिक नागरिक बिनधास्त महामार्गावर आपली चारचाकी गाडी लावून जातात .आश्रम रोड वर सुद्धा बिनधास्त पार्किंग होत असुन वाहतूक पोलीस व ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महात्मा गांधी रस्ता तर हा आपली घरची मालमत्ता असल्याच्या आविर्भावत येथे पार्किंग होत आहे
येथून पायी चालताना नागरिकांना मात्र मोठी कसरतच करावी लागत आहे.
पायी चालताना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. उरुळी कांचन परीसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी आपली दुकाने रोडवर लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, फळांची दुकाने रोडवरच लावल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.त्यात दुकाने रोडवर असल्याने फळे घेणारे ग्राहक आपली चारचाकी रोडच्या मधोमध थांबवून खरेदी करतात.
त्यामुळे इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने वाहतूक कोंडी होते. ग्रामपंचायतीने या दुकानदारांना परवानगी कशी दिली अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.तसेच उरुळी कांचन सारख्या गावाच्या ठिकाणी तेरा गावे चाळीस वाड्या वस्त्यातील उलाढाल होत असल्याने उरुळी कांचन गावात सातत्याने वाहतूक कोंडी होते.तसेच उरुळी कांचन मधील दुकानासमोर तर संध्याकाळी चारच्या नंतर मोटार सायकल चारचाकी गाड्या दोन्ही बाजूला लावत असल्याने वाहतूक कोंडी दररोजची होत आहे.अशा वाहतूक कोंडी ठरणाऱ्या वाहनाकडे व दुकांनाकडे मात्र ग्रामपंचायत व पोलीस जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.अशा वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहन चालकांवर तसेच पार्किंगवर कारवाई कधी होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
ग्रामपंचायत अतीक्रमण हटविण्यासाठी कारवाई करत असून हा फक्त दिखाऊ फार्स असुन कारवाई फक्त नावापुरतीच असते अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे