सुनील भंडारे पाटील
बुर्केगाव (तालुका हवेली) येथे एका चार वर्षीय लहान मुलीवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केल्याने ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालय पुणे येथे उपचार चालू आहेत, या हल्ल्यात बिबट्याने मुलीच्या गळ्यावर गंभीर जखमा केल्या आहेत, ही घटना गुरुवार तारीख 14 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली,
काल सायंकाळच्या सुमारास चौरे कुटुंब गावठाणाच्या शेजारी आपल्या शेतामध्ये फ्लावर तरकारी काढून पोत्यामध्ये भरत असताना, त्यांच्यापासून अवघ्या अंदाजे दहा फूट उभ्या असणारी मुलगी पुनम दत्तात्रय चौरे हिचा अचानक ओरडण्याचा आवाज आला, आई वडील दत्तात्रय चौरे, आशा चौरे तसेच त्यांच्याकडे कामाला असणारा गडी यांनी अचानक त्या दिशेने धाव घेतली असता, बिबट्या लहान मुलीला शेजारील उसात ओढत नेत असल्याचे निदर्शनास आले, सर्वांनी आरडाओरडा केला, तसेच वाढलेल्या मोठ्या ऊस पिकामुळे बिबट्याला उसामध्ये मुलीला घेऊन पळता आले नाही, त्यामुळे तो मुलीला सोडून पळाला,
घटनेत या लहान मुलीच्या गळ्यावर तसेच मानेवर, डोक्याला, पाठीला गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीच्या उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे दाखल करण्यात आले आहे, या घटनेने बुर्केगाव तसेच परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, लोकांच्या समोर एका लहान मुलीवर बिबट्याने धाडसाने हल्ला केल्याने, परिसरात चर्चेला उधाण आले आहे,
पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्यात भीमा नदीच्या काठावर दोन्ही बाजूने मोठी उसाची शेती असून या परिसरात बिबट्याचे अस्तित्व दाट आहे, शेतकऱ्यांवर अनेक हल्ले झाले आहेत, कोरेगाव भीमा, वाजेवाडी, वढू बुद्रुक, डिग्रजवाडी, सणसवाडी, पिंपरी सांडस, या गावांमधील भर मनुष्य वस्तीत तसेच शेतामध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असताना आता या घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे, राज्य शासनाने या घटनांची गंभीरतेने दखल घेऊन, बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे,