लोणी काळभोर अनिकेत मुळीक
वयोवृद्ध शेतकऱ्यांना आधारकार्ड अपडेट करण्यासाठी बोटांचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पात्र असताना अनेक योजनांना मुकावे लागत आहे.तसेच बँकेसह इतर सर्वच कामे खोळंबली आहेत. यातून प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी वयोवृद्ध शेतकऱ्यांनी केली आहे.
आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक झाले आहे. यामुळे राज्यात सर्वत्र आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधार कार्ड अपडेटमध्ये मोबाईल नंबर, ई- मेल जोडावा लागत आहे. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर बँक खाते, ७/१२, ८ अ व इतर अनेक ठिकाणी लिंक करणे गरजेचे झाले आहे.
यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आधार कार्ड अपडेट व इतर कागदपत्रांसाठी लिंक करुन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. युवक, युवतींचे आधार कार्ड अपडेट करण्यास अडचणी निर्माण होत नाहीत. पण, ७० वर्षांपुढील किंवा ज्यांचे मेहनतीचे जास्त काम आहे, अशा नागरिकांचे, महिलांचे ठसे उमटणे कठीण झाले आहे.
ठसे जुळत नसल्यामुळे अनेकांचे आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक होत नाही. आधार कार्ड अद्ययावत नसल्यामुळे बँकेचे व्यवहार, शेतीचे अनुदान, इन्कम टॅक्स रिटर्न्स आदी कामे अनेकांची रखडली आहेत.
शेतकरी आधार सेंटरवर चकरावर चकरा मारत आहे. पण, बोटांचे ठसे उमटत नाहीत. यामुळे रेशन मिळणे कठीण झाले आहे. रेशन दुकानदार म्हणतो ठसे उमटल्याशिवाय आम्हाला रेशन देता येत नाही, तुम्ही आधार सेंटरवर जाऊन अंगठा अपडेट करा. काय करावे ते कळत नाही. रेशन बरोबर वेगवेगळे अनुदान आम्हाला मिळत नाही, असे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यावर नवीन काही तरी उपाय योजना करायला हव्यात ; सरकारने या वर गांभीर्याने लक्ष घालावे..