सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नासिर शेख सहसचिव जाहीद शेख संस्थेचे सीईओ अमीर इनामदार प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात असे सांगून संस्थेचे अध्यक्ष नासिर शेख यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. प्राचार्य डॉ. एस.डी. नवले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा असून सर्वांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यंदा प्रथमच फार्मसी च्या पाच महाविद्यालयांनी एकत्रित येत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ डी. फार्मसी खराडी व हडपसर, लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी फुलगाव तसेच सीताबाई थिटे कॉलेज ऑफ डी फार्मसी शिरूर या पाच महाविद्यालयांनी एकत्रित येत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात यावर्षी प्रथमच केलेले आहे. याप्रसंगी खराडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल, हडपसर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे, फुलगाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरहरी पाटील , शिरूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुलींमध्ये प्रथम क्रमांक स्नेहा ठाकूर शंकरराव उरसळ फार्मसी कॉलेज खराडी तर द्वितीय क्रमांक पायल ताठे पीडीइए फार्मसी कॉलेज हडपसर यांनी पटकावला. तसेच मुलांमध्ये सीताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसीच्या तुषार धाडगे व यश मचाले यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे व विजयी खेळाडूंचे अभिनंदन प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. जीवन राजगुरू यांनी तर सूत्रसंचालन सोनल सातव यांनी केले.