शिंदवणे (तालुका हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कंझार भट परिसरातील एका शेतामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांनी छापा मारून तब्बल ३ चार हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.
या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून दारू बनविण्याचे कच्चे रसायन, साहित्य जप्त केले आहे. कांतीलाल जवार राठोड, (वय ३४ ), रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे गावातील एका शेतामध्ये गावठी दारूची भट्टी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सदर शेतामध्ये छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी भट्टीचालक राठोड याला ताब्यात घेत चार हजार लिटर दारू असलेली ११३ कॅन जप्त केले. तसेच हातभट्टी बनवण्याची साधने जागीच नष्ट केली.