शिरूर प्रतिनिधी
शिरूर : तसे पाहता सामान्य शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील माती दुसऱ्या शेतात नेण्यासाठी महसूल विभागाचे उंबरे झिजवावे लागतात. तेवढे करूनही स्वतःच्या शेतातील माती साठी अधिकाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतात तेव्हा कुठे परवानगी मिळते. पण शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथे मागील काही दिवसापासून गट क्रं.५१९ (ई) मधून पंधरा ते वीस दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे विना परवाना उत्खनन केले जात आहे.
ईचके वस्ती ते जाधव रासकर वस्ती २ ते ३किलोमीटर कॅनॉलच्या रस्त्याचा भराव करीत आहे.सदरची वाहतूक करताना इतर वाहनासह शासकीय वाहनांचा राजरोसपणे वापर करण्यात आला असून ज्या ठिकाणी उत्खनन झाले तेथून कॅनॉल पर्यंत जे वाहने मुरूम वाहतुकीसाठी लावण्यात आले त्यांनी अयोग्य व बेकायदेशीर रित्या शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवलेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून सदर मुरुमाची रॉयल्टी न भरल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे.
महसुल विभागाची कोणतीही परवानगी न घेता खाजगी जागेत उत्खनन करून शासकीय वाहनांच्या साह्याने खाजगी जागेत मुरुम टाकल्या ने या भागातील शेतकऱ्यांन मध्ये चर्चा सुरु असुन संबधित अधिकारी च्या अशिर्वादाने हे गौणखनिज शासकीय वाहनाने खाजगी जागेत टाकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एका तक्रारदाराने कायदेशीर कारवाई होण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार देवून शासनाची रॉयल्टी बुडवून शासकीय वाहनाने खाजगी जागेत गौणखनिज वाहतुक करत शासनाची फसवणुक करत असुन या सर्व प्रकरणाची त्वरीत चौकशी होवून पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग खात्यातील संबधित अधिकाऱ्यांविरुद्ध गौण खनिज चोरी या कलमान्वये त्वरीत गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून तक्रार केली असुन योग्य कारवाई न झाल्यास सर्व पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे जाणार आसल्याचे सांगितले,संबंधित प्रकारात जिल्हाधिकारी, प्रांत, शिरूर तहसिलदार बाबत काय कारवाई करणार निमगाव भोगी चे ग्रामस्थांची आस लागुन आहे.