अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो.यातच शरद पवारांचे नेतृत्व सिद्ध होते - डॉ.अमोल कोल्हे

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
            लोकसभा निवडणूक २०२४ संसदेच्या प्रांगणात उभे राहून ज्यांनी आव्हान दिले होते, त्याच्या अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा, याचे आश्‍चर्य वाटले. एवढी वर्षे पुण्याचे नेतृत्व करताना अजित पवार यांना माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकर्‍याच्या मुलासमोर उमेदवार आयात करावा लागतो, हे शरद पवार यांचे यांचे नेतृत्व सिद्ध करते.
मंचर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार कांदा प्रश्‍न, दूधाचा प्रश्‍न, बिबट्यांचा यावर चकार शब्द उच्चारला नाही याची खंत वाटते, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे 'नाईलाजास्तव' लादलेले उमेदवार असल्याचा टोला लगावला.
            राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात मंगळवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे यांनी खाजगीतील गोष्टी सार्वजनिक करायच्या झाल्यास अनेक गोष्टी येतील, असा इशाराही यावेळी अजित पवार यांना दिला. तसेच मंचर येथील सभेत अजित पवार आणि आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेच्या संयमी शब्दात मात्र तिखट समाचार घेतला. संसदरत्न पुरस्कार चेन्नईतील एका खोलीत बसून दिला जातो, या टीकेला उत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले, हा तर शिरूरच्या जनतेचा अपमान आहे. संसदरत्न पुरस्काराची संकल्पना डॉ. ए.पी.जे. कलाम साहेबांची होती. पुरस्कार निवड समितीमध्ये केंद्रीय संसदीय कार्यमंत्री असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या संसदरत्न पुरस्काराबद्दल अजित पवार आणि आढळराव पाटील यांनी भूमिका जाहीर करावी, असे आव्हान दिले.
            आढळराव पाटील यांनी १५ वर्षे खासदार असताना मतदार संघामध्ये आणलेले प्रकल्प सांगावेत. याउलट मी आणलेले प्रकल्प सांगतो, असे आव्हान देताना इंद्रायणी मेडी सिटी, पुणे नाशिक रेल्वे, बिबट पुनर्वसन प्रकल्प, छत्रपती संभाजी महाराज स्मारक या संकल्पना कोणाच्या आहेत? हे अजित पवार यांनी सांगावे. उलट आढळराव पाटील यांनी खेडमधील विमानतळ घालविल्याने पिछेहाट झाली. कोरोना काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रत्येक बैठकीला मी होतो. डॉक्टर असल्याने फॅबी फ्ल्यू या गोळीची किंमत कमी करून देशभरातील नागरिकांना उपलब्ध करून देउ शकलो. सीरमच्या माध्यमातून मतदार संघातील पाच लाख नागरिकांचे लसीकरण केले. शेतकर्‍यांचा कांदा निर्यात असो अथवा दूध दराचा प्रश्‍न असो शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून संसदेत मी सातत्याने आवाज उठवला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, नितीन कदम, गणेश नलावडे उपस्थित होते.
नथुराम गोडसेंबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांच्या स्टेजवरून बोला…
           मंचर येथील आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यामध्ये डॉ. कोल्हे हे केवळ संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या भुमिकेबद्दल सांगतात. नथूराम गोडसे यांच्या भुमिका केल्याबद्दलही बोला असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी त्या भुमिकेबद्दल नंतर आळंदी येथे प्रायश्‍चित केल्याचे सांगितले. परंतू आज नथूराम गोडसे यांच्या मी केलेल्या भुमिकेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या स्टेजवर राहून पुन्हा बोला, असे प्रतिआव्हान करत डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांच्या आव्हानातील हवाच काढून टाकली.
            अजित पवार यांची माझ्याबाबतची मागील वर्षी २७ जूनपुर्वीची भुमिका आणि त्यानंतरची भुमिका ही पब्लिक डोमेनमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील सभेत केलेल्या उल्लेखानंतर अजित पवार यांची भुमिका बदलली. मी माझ्या भुमिकेशी ठाम असून माझी निष्ठा कायम शरद पवार यांच्यासोबत आहेत. यामुळे युटर्न कोणी आणि का घेतला? हे जनतेला माहिती. खाजगी गोष्टी उघड करायचेच ठरवले आहे, तर येत्या काळात मलाही त्या उघड कराव्या लागतील असा सूचक इशाराही डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता दिला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!