लोणी काळभोर प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता प्रचाराला हळूहळू रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक वाद रंगू लागला आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांचा आगामी निवडणुकीत पराभव करणार असल्याचे आव्हान अजित पवार यांनी दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद चांगलाच रंगला आहे. आता अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, विद्यमान खासदार हे डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. ही अशा प्रकारची डायलॉगबाजी मालिकेत, चित्रपटात शोभून दिसते. पण, ही डायलॉगबाजी जनतेसमोर कामी येत नाही असा टोलाही पवार यांनी लगावला.
अजित पवारांचे चँलेज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, त्यांचे कार्य घराघरात पोहचवले अशी साद घालतात आणि मते मागतात. पण, २०२० मध्ये तुम्ही एका चित्रपटात नथुरामची भूमिका केली होती हेदेखील सांगा. फक्त सोयीची असलेली भूमिकांबद्दल का सांगता असा टोला अजित पवार यांनी लगावला. नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचा प्रचार करणार का, असा सवालही त्यांनी केला.
तुम्हाला उपलब्ध होणारा खासदार हवा...
अजित पवार यांनी म्हटले की, राजकारण हा आपला पिंड नसल्याने ते आपले काम नाही, असे सांगणारे आता निवडणुकीला उभे राहिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. आढळराव-पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आणि कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची तुलना करावी असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. आढळरावांची ही घरवापसी आहे,तर तुमचे पक्षांतर झालेले आहे,असा टोला त्यांनी कोल्हेंना लगावला. मतदारांना उपलब्ध होणारा खासदार हवा आणि आढळराव हे लोकांसाठी उपलब्ध असतात, असेही पवार यांनी म्हटले.