सुनील भंडारे पाटील
वाघोली (ता हवेली) येथील गायरान गट नंबर 1419 वाघेश्वरनगर तालुका हवेली जिल्हा पुणे या दगडखाण कामगार वस्तीवर अनाधिकृतरित्या भला मोठा कचरा डेपो करण्यात आला होता. या कचरा डेपो विरोधात क्र.62/2020 नुसार राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयामध्ये दगडखाण कामगार परिषदेच्या वतीने दावा दाखल केला होता. अंतिम निकालात न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला दणका दिला असून पर्यावरण नुकसान भरपाईसाठी रक्कम रुपये 1,79,10000/- चा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे भरण्याचा व तेथे पुन्हा कचरा न टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाणारे पुणे लगतच्या वाघोली गावाबाहेरील दगडाच्या खाणीत 26 वर्षांपूर्वी ऍड. बस्तू रेगे व ऍड. पल्लवी रेगे यांनी संतुलन संस्थेच्या माध्यमातून दगडखाण कामगारांचा मूलभूत न्याय हक्क व परिवर्तनात्मक सामाजिक कार्याला सुरुवात केली.
दगडखाण कामगारांचा कुठेही व कोणत्याही प्रकारच्या दफ्तरी नोंद अथवा जनगणने मध्ये सुद्धा समावेश नाही. ‘जगणे’ एवढाच हेतू पुढे ठेवून अस्तिवहिन जिवन जगणारी हा समुदाय सुमारे पन्नास ते साठ प्रकारच्या आर्थिक व सामाजिक मागासलेल्या वर्गातील समाजामध्ये आपसात संवाद व संघटन नसल्याचा फायदा सर्वच घेत.
सर्वांसाठी घरे बांधणारे मात्र हक्काच्या घरा पासून वंचित. कसेल त्याला जमीन, राहील त्याला घर नसलेल्यांचे काय? सरकारी जमीन या घोषणेला वास्तवात उतरण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नियम 1971 मधील कलम 45 नुसार बेघर, भूमिहीन व मागासवर्गीय दगडखाण कामगारांना गायरान व इतर सरकारी जमिनीवर निवास प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली. मौजे वाघोली येथे तीस ते चाळीस वर्षापासून हजारो कुटुंबे वाघेश्वरनगर, बुरुंजवाडी, सुयोगनगर व गाडीतळ या गायरान जमिनीवर वास्तव्य करत आहेत. घरासाठीची जमीन कायद्यातील तरतुदीनुसार व शासनाच्या वेळोवेळी झालेल्या निर्णयानुसार अतिक्रमण धारक कष्टकऱ्यांच्या नावे सातबारा करावा यासाठी गेली पंचवीस वर्षे लिखित व आंदोलनात्मकरित्या शासन व प्रशासनाकडे मागणी ठेवली आहे. दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी वाघोली ग्रामसभेचा ठराव घेऊन दि. ११ ऑक्टोबर 2018 रोजी मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी अप्पर सचिव, महसूल विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.
खाण कामगार हे घान कामगार समजून सन 2015 मध्ये वाघेश्वरनगर या कामगार वस्तीमध्ये गावचा मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यास सुरुवात झाली. सुमारे दोन-तीन एक्कर जागेवर कचऱ्याचे मोठमोठे ढीग उभारले. लगतच कामगार वस्ती असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी, किडे, डास यामुळे मुले, महिला, वृद्ध यांना वेगवेगळे आजार... डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू सारख्या आजाराने अनेकांचा बळी गेला. वस्तीमध्ये कचरा टाकू नका कचऱ्याचा डेपो दुसरीकडे हलवा या मागणीची निवेदन दिनांक 26/ 3 /2015 रोजी ग्रामपंचायतला देण्यात आले. दिनांक 24/ 9 /2019 रोजी झालेल्या ग्रामसभेत एडवोकेट बी.एम. रेगे यांनी कचरा टाकणे बंद करण्याची मागणी केली. त्यावेळी बहुसंख्या ग्रामस्थ खवळले व कचरा डेपो जवळील अतिक्रमित बेकादेशीर कुंटुंबांची घरे काढून कचऱ्याची जागा करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली. कामगारांच्या आरोग्याला धोका वाढू लागला. त्रस्त कष्टकरी, गोरे वस्ती येथील ग्रामस्थ व सोसायट्यामधील जनतेने आवाज उठवला मात्र कचरा काही हटला नाही. दिनांक 10/12/2016 रोजी दगडखान परिषदेच्या वतीने मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, प्रदूषण महामंडळ, पुणे महानगरपालिका, ग्रामपंचायत वाघोली, आदींना संतुलनने नोटीसा दिल्या. तरीही कोणाकडूनही समस्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटचा पर्याय म्हणून सन 2020 मध्ये संतुलन संस्थेने राष्ट्रीय हरित लवाद (एन. जी. टी.) पश्चिम विभाग पुणे येथे दिल्लीचे एडवोकेट रित्विक दत्ता व एडवोकेट राहुल चौधरी यांच्या मदतीने दावा क्रमांक 62/2020 दाखल करण्यात आला. एन. जी. टी. न्यायालयाने दि. 29/9/2020 रोजी पीएमआरडी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड व हवेली तहसीलदार या तिघांची जॉईंट समिती स्थापण केली. दरम्यानच्या काळात 30/6/ 2021 रोजी वाघोली मनपा यांच्याकडे वर्ग केल्याने निकालाचा आदेश कोणावर बंधन करक होणार यावर न्यायालयाने विचारणा केली असता वकील एडवोकेट रित्विक दत्ता व एडवोकेट राहुल चौधरी यांच्या सक्षम युक्तिवादाने पुणे मनपा हीच जबाबदार आहे हे निश्चित करण्यात आले व एन.जी. टी. ने दिलेल्या सहाव्या अंतिम आदेशा नुसार वाघेश्वरनगर येथे कचरा टाकने बंद करून पर्यावरणाच्या हानीचे नुकसान भरपाई म्हणून पुणे महानगरपालिके वर रक्कम रुपये 1,79,10000/- दंड लावण्यात आला आहे. ही रक्कम महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडे भरण्याचे पुणे मनपा ने मान्य केले आहे.
ज्या कष्टकऱ्यांना ‘खाणकामगार हे घाण कामगार’ म्हणून संबोधले जात होते त्यांना न्याय मिळाला असून संतुलन संस्थेच्या कचरा हटाव लढ्याला मोठे यश मिळाले. वाघोली येथील दगडखाण कामगारांना मिळालेला हा दुसरा मोठा कायदे शीर विजय आहे. कचरा डेपोच्या जागेवर दगडखाण कामगारांसाठी ऐतिहासिक विकास भवन उभे करावे या पूर्वनियोजित मागणीने वाघेश्वरनगर येथे विजय मेळावा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
मेळाव्यात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ऐतिहासिक दगडखाण कामगार विकास भावनाच्या नाम फलकाचे उदघाटण करण्यात आले. कार्यक्रमात 19व्या ठिणगी वार्ता आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित कामगारांना दगडखान कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बी. एम. रेगे, संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचे अध्यक्ष ऍड. पल्लवी रेगे, सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे, अंबादास साळुंखे, सुरेश पवार, नागेश पवार, संतुलन महिला संघटनेचे कार्यकर्ते सुरेखा गायकवाड, बेबी बोकले, आशा बांगार, कांताबाई पवार यांनी मार्गदर्षन केले. कार्यक्रमायचे संयोजन मऱ्याप्पा चौगुले, लक्ष्मण पेटकर, प्यारेलाल जाठव, राजेंद्र राक्षे, भिमराव म्हस्के, आदिंनी केले. प्रकाश पवार यांनी परिषदेतील ठराव मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अदिनाथ चांदणे यांनी केले. विजय साळवेंनी भक्ती भाव व जागृती गितांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. संतुलन संस्थेच्या पाषाण शाळा शिक्षक व कार्यकर्त्यांनी विशेष कष्ट घेतले.