नगर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांसह दलालांवर कारवाईची मागणी
वाघोली प्रतिनिधी
वाघोली (तालुका हवेली) येथे पुणे-नगर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या दलालांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाघोली येथे पुणे-नगर रोड, वाघोली-लोहगाव रोडलगत बार व लॉजिंग मोठ्याप्रमाणावर असल्याने काही दलालांकडून महिलांची देहविक्री केली जाते. सायंकाळ पासूनच रात्री उशिरापर्यंत देहविक्री करणाऱ्या महिला वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील पदपथावर उभ्या राहून ग्राहकांच्या शोधात असतात. त्यांच्या बाजूलाच काही अंतरावर एजंट थांबलेले असतात.
बुधवारी (५ जून) रात्री पाऊणे अकराच्या सुमारास देहविक्री करणाऱ्या महिलांच्या काही दलालांनी दीपक कैलास परांडे (रा. रेणुका पार्क, उबाळे नगर) या तरुणाला डोक्यात बेदम मारहाण केली. याप्रकरणी दीपक परांडे यांच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुट्टे यांच्या नेतृवाखाली नागरिकांसह महिलांनी वाघोली पोलीस चौकीला जावून पुणे-नगर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांसह त्यांचा दलालांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मागणी केली आहे.
पुणे-नगर रस्त्यावर अशाप्रकारे महिलांच्या देहविक्रीचा प्रकार दलालांकडून होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.- सीमा ढाकणे (पोलीस निरीक्षक, लोणीकंद)
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे किंवा दलालांकडून महिलांची देहविक्री केली जात असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - चेतन थोरबोले (सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी, वाघोली चौकी)