सुनील भंडारे पाटील
राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकसित व्हावे,व्यवसाय करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना शासन राबवत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यासंदर्भात विधानपरिषद नियम ९३ अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचना उपस्थित केली होती, पाटिल म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकसित करणे, व्यवसाय करण्याची आवड निर्माण करण्यासाठी ही योजना शासन राबवत आहे. या योजनेसाठी शासनाच्या दहा पॉलिटेक्नीकल इंजिनीअरींग कॉलेजना ५३ कोटी ६६ लाख रूपये मंजूर केले आहेत.
सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) देखील तयार करत आहोत. लवकरच ही केंद्र सुरू होईल. प्रत्येक भागाची गरज लक्षात घेवून तसे अभ्यासक्रम तयार केले जातील तसेच उपलब्ध मनुष्यबळाला सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि त्यांना रोजगार देखील प्राप्त होईल असा या योजनेचा उद्देश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही नवीन कौशल्य विकास निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार करावे, असेही सांगितले आहे. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचावी यासाठी ५० हजार योजनादूत नेमले जाणार आहेत.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देतानाच त्यांतर्गत हे योजनादूत नेमले जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत असेल. हे योजनादूत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिध्दी करतील. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर आदी तरूणांना रोजगार प्राप्त होणार आहेत असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.