सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) येथील वाहतूक समस्येबाबत आमदार अशोक पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी,पीएमआरडीए,सार्वनिक बांधकाम विभाग, महावितरण व महापालिका अधिकारी यांच्या समवेत संयुक्तपणे मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासन वगळता इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र गैरहजर होते.
पुणे नगर महामार्गाला पर्यायी बायपास रस्ता विकसित करणे, केसनंद फाटा चौकाचे स्थलांतर करणे,खाजगी ट्रॅव्हल्स बसेस रस्त्यावर थांबणार नाहीत यासाठी दक्षता घेणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवून बंच केबल टाकणे आदी उपाययोजना बाबत चर्चा झाली.
वाघेश्वर मंदिर चौकातून बायफरोड कडे उलटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी पदपथ काढून रस्ता विकसित करणे. केसनंद फाटा स्थलांतर करणे, महामार्गालगत पदपथ हटवून त्या जागी रस्ता करणे, वाघेश्वर मंदिर ते लोणीकंद येथील सुरभी चौक रस्ता विकसित करणे, लोणीकंद मध्ये थेऊर रोडने येणाऱ्या चौकातील चढ कमी करणे आदी ठिकाणी पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्य रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स बसेस,डंपर, कंटेनर उभे राहता कमा नये असे आदेश मनोज पाटील यांनी लोणीकंद वाहतूक विभागाला दिले.खांदवे नगर ते लोणीकंद पर्यंत महामार्गाची पाहणी करून वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. आमदार अशोक पवार यांनी पीएमआरडीए, महापलिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गरजेची कामे त्वरीत करून देण्याची मागणी केली.
यावेळी आमदार अशोक पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील,वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे,पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, शिवदास उबाळे, राजेंद्र सातव राजेंद्र पायगुडे,अतुल शिंदे,विजय वाळुंज तसेच इतर गामस्थ उपस्थित होते.
महापालिका,पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त प्रत्येक पाहणी वेळी कामे करू एवढेच उत्तर देतात. तर अशा पाहणी दौऱ्यात वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहतात.
झपाट्याने विकसित होणाऱ्या वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सह सर्वच समस्या बाबत आमदार अशोक पवार वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठका घेत पाहणी करत आहे, या समस्येबाबत आमदार पवार यांनी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित करत समस्यांचे गांभीर्य विधानसभेत सर्वा समोर मांडले आहे .