ज्ञानराई वनउद्यान ऑक्सीजन पार्क निमिर्ती प्रकल्पास मान्यता शाश्वत पर्यटन विकास प्रकल्प चाकण आळंदी मार्गावर होणार
खेड तालुक्याचे स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे खेड तालुक्याचे शाश्वत व पर्यटन विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाकण-आळंदी मार्गावर ज्ञानराई वनउद्यान ऑक्सीजन पार्क निमिर्ती प्रकल्प विकसित होणार आहे. या प्रकल्पाचे अहवालास अंतिम मान्यता स प्रकल्पास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांचे कडून मिळाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितिन गोरे यांनी दिली आहे.
आळंदी चाकण रस्त्यावर वन विभागाची मोठी जागा आहे. या वन विभागाच्या जमिनीवर ऑक्सीजन पार्कची निमिर्ती करण्याचा प्रस्ताव देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे यांनी मागणी केली होती. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी करीत प्रस्ताव देऊन पाठपुरावा केला. या बाबत मुख्यमंत्री व वनमंत्री यांनी संबंधित विभागाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही दिले होते. तसेच या मागणी बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या कडेही मागणी करुन वनविभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक घेऊन हा प्रकल्प दोन्हीही विभागाकडून एकत्रित करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करुन निधी व अन्य सर्व बाबींसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला होता. सर्व संबंधीत दोन्ही विभागांमध्ये सकारात्मक बैठका होऊन याबाबतच्या प्रकल्प अहवालास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. यामुळे आळंदी चाकण मार्गावर ज्ञानराई वनउद्यान या नावाने प्रकल्प विकसित होत आहे. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. यामध्ये गवता पासून तयार केलेली उद्याने, वृद्धांसाठी नाना-नानीपार्क, तरुणांसाठी फिटनेस पार्क, चिल्ड्रेन पार्क, योगापार्क, पक्षी निरीक्षण केंद्र इत्यादींचा समवेश असणार आहे. यामुळे चाकण व आळंदी परिसरातील नागरिकांना तसेच आळंदी तीर्थक्षेत्र येथे येणाऱ्या लाखो भाविकांसह चाकण औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. प्रकल्पाच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या पर्यटना सोबतच पर्यावरण जनजागृती व संरक्षण यावर भर पडणार आहे. या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार असल्याचे नितीन गोरे यांनी सांगितले.