सुनील भंडारे पाटील
महिलांच्या न्याय हक्कासाठी महिला दिनाचे औचित्य साधत संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदेचे अध्यक्ष अँड पल्लवी रेगे व दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष अँड.बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखाली विधान भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला अत्याचार निषेध भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपस्थित राहून मोर्चाला पाठिंबा दिला. वाघोलीच्या माजी सरपंच जयश्रीताई सातव यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शविला.
पुण्यामध्ये दिवसे दिवस महिला व मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने त्यांची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे. अशा अमानुष अ मानवी प्रवृत्तीच्या निषेधार्थ भव्य असा मोर्चा विधान भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला.
महिलांना न्याय अधिकार मिळावा, सुरक्षा व सामाजिक शैक्षणिता वाढावी यासाठी विविध मागण्यांचे निवेदन विधान भवन विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मोर्चाप्रसंगी एडवोकेट पल्लवी रेगे यांनी राष्ट्रपुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यनगरी महिलांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली, त्यांनी जागतिक महिला दिन कसा साजरा करायचा असा बेधडक सवाल विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना केला. महिलांनी रणरागिनी होऊन अत्याचाराविरुद्ध लढले पाहिजे असे मत मांडले व महिलावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करून विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
महिलांच्या अन्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आपण कायम संतुलन संस्थेच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विधान भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध घोषणा व जागृती गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतुलन संस्थेचे अध्यक्ष वंदनाताई भुजबळ, बेबी बोकले, कौशल्या पांडे, कांचन ओव्हाळ, सुरेखा गायकवाड, जहीरा शेख यासह पुणे जिल्ह्यतून मोठ्या संख्येने महिला व युवती उपस्थित होत्या.