शिक्रापूर (राऊतवाडी) येथे सरकारी जागेवर अनधिकृत प्लॉटिंग; प्रशासनाची तातडीने चौकशी सुरू
पुनर्वसन जमीन वाटपाचा महाघोटाळा उघडकीस येण्याची शक्यता..
सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील राऊतवाडी लव्हार्ड पुनर्वसन गावठाणातील गट क्रमांक ४२, ५० आणि ५८९ मधील भूखंडांमध्ये नियमबाह्य अनधिकृत प्लॉटिंगचे प्रकार उघडकीस आले आहेत. एका नागरिकाने केलेल्या गंभीर तक्रारीनुसार, या भागात सरकारी नकाशावर असलेल्या सार्वजनिक सुविधा — रस्ते, शौचालय, गटार लाईन आणि स्मशानभूमी — उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग करून विक्री सुरू आहे.
या भूखंडांचे वाटप पुनर्वसन योजनेअंतर्गत केवळ निवासी वापरासाठी करण्यात आले होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करत हे भूखंड इतरांना विकले आणि त्या जागांवर बेकायदेशीर प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. केवळ सार्वजनिक सुविधा नव्हे, तर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनींवरही दबाव आणून अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता उपविभागीय अधिकारी, शिरूर (पुणे उपविभाग) यांनी दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदार, शिरूर यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून पंचनाम्यासह सविस्तर अहवाल तयार करून सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून, कोणताही विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी तहसील कार्यालयावर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पीएमआरडीए यांच्याकडे अधिकृत तक्रार सादर करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई होण्याची शक्यता असून, संबंधित मालमत्ता जप्त होऊन ती शासनाच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासनाकडून सुरू झालेल्या कारवाईमुळे गावात समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, शासकीय मालमत्तेचे रक्षण व्हावे, अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त केली आहे.